जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात श्री महेश नवमी उत्सव २०२५ निमित्त बुधवार, दि. ४ जून रोजी उत्साहाचे वातावरण होते. माहेश्वरी समाजाच्या उत्पत्ती दिनानिमित्त विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी शहरातून काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत महिला, पुरुष आणि लहान मुलांनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला, ज्यामुळे शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. शोभायात्रेत भव्य शिवलिंगाची प्रतिमा हे विशेष आकर्षण ठरले.
सकाळपासूनच धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. सकाळी ६ वाजता बालाजी पेठ येथे भगवान महेश यांचा अभिषेक व महाआरती करण्यात आली. त्यानंतर सकाळी ८ वाजता पांजरपोळ गोशाळेत गोमातेला लापशी वाटप करण्यात आले, तर बाहेती पाणपोईजवळ अन्नदान वाटप कार्यक्रमही घेण्यात आला. समाजबांधवांनी एकत्रित येत या उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. माहेश्वरी समाजातर्फे सकाळी १० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.
महेश नवमी निमित्त अयोध्या नगर येथील शिव मंदिरात ६१ किलो आंब्याची आकर्षक आरास करण्यात आली होती, जे भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरले. सर्वात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे माहेश्वरी बोर्डिंग येथे सकाळी ११ वाजल्यापासून रात्रीपर्यंत आयोजित करण्यात आलेले रक्तदान शिबिर. या शिबिराला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची रक्तपेढी, इंडियन रेडक्रॉस सोसायटी आणि गोळवलकर रक्तपेढी यांचे सहकार्य लाभले. या शिबिरात समाजातील अनेक बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन २३२ रक्तपिशव्या संकलित केल्या, जे एक कौतुकास्पद काम आहे.
दुपारी माहेश्वरी बोर्डिंग येथून भव्य शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला. सुरुवातीला सजवलेल्या बग्गीने शोभायात्रेत शोभा आणली. यात्रेत भव्य शिवलिंगाची प्रतिमा हे विशेष लक्ष वेधून घेत होते. सोबत एका वाहनावर भगवान महादेवाची भव्य प्रतिमा सजविण्यात आली होती, तर दुसऱ्या वाहनात भगवान शिव आणि पार्वती यांच्या वेशभूषेत लहान बालके सहभागी झाले होते. यावेळी महिला-पुरुष आणि लहान मुलांचा उत्साह ओसंडून वाहत होता, त्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केल्या होत्या.
शोभायात्रा माहेश्वरी बोर्डिंग येथून नेहरू चौक, टॉवर चौक, घाणेकर चौक, दाणा बाजार, नवी पेठ, शिवतीर्थ चौक मार्गे पुन्हा माहेश्वरी बोर्डिंग येथे विसर्जित झाली. याठिकाणी भाविकांनी महेश वंदना सादर केली. ही भव्य शोभायात्रा आणि श्री महेश नवमी उत्सव यशस्वी करण्यासाठी माहेश्वरी समाजाच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन परिश्रम घेतले. यातून समाजाची एकजूट आणि सामाजिक बांधिलकी दिसून आली.