जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्याच्या पोलिस दलातील १४ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. या बदल्यांमुळे प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल झाले असून, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून हे बदल महत्त्वाचे मानले जात आहेत.
या बदलींच्या यादीत सर्वात लक्षवेधी बदल म्हणजे स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) प्रभारी बबन आव्हाड यांची पुन्हा एमआयडीसी पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अव्हाड यांनी वर्षभरापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या जागी आता एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांची स्थानिक गुन्हे शाखेत बदली झाली आहे. या दोन महत्त्वाच्या बदल्यांमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणाच्या धोरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
या व्यतिरिक्त, इतर अनेक अधिकाऱ्यांच्याही बदल्या झाल्या आहेत. कावेरी कमलाकर यांची चोपडा ग्रामीणमधून शनी पेठ येथे बदली झाली आहे, तर दत्तात्रय निकम अमळनेरमध्येच कायम आहेत. रंगनाथ धारबळे यांना शनी पेठमधून यावल येथे पाठवण्यात आले असून, प्रदीप ठाकूर यांची यावलमधून जिल्हापेठ येथे बदली झाली आहे. सुनील पवार यांना पारोळ्यातून नियंत्रण कक्षात हलवण्यात आले आहे.
आर्थिक गुन्हे शाखेतील सोपनि प्रमोद कठोरे यांची पहूर येथे, तर वरणगाव येथील सोपनि जनार्दन खंडेराव यांची यावल येथे बदली झाली आहे. भुसावळ बाजारपेठ येथील सपोनि अमितकुमार बागुल यांना वरणगाव येथे पाठवण्यात आले आहे. सपोनि प्रकाश काळे यांची पिंपळगाव हरेश्वरमधून जळगाव शहर येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी सपोनि कल्याणी वर्मा जळगाव शहर येथून पिंपळगाव हरेश्वर येथे रुजू होणार आहेत. तसेच, पाचोरा येथील पोउनि सोपान गोरे यांची स्थानिक गुन्हे शाखेत (LCB) बदली झाली आहे.
या बदल्यांमुळे जिल्ह्यातील पोलिस दलाच्या कार्यपद्धतीत नवीन ऊर्जा येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नव्याने नियुक्त झालेले अधिकारी आपापल्या कार्यक्षेत्रात कशा प्रकारे काम करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.