यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नुकतेच तालुक्यातील डोंगरकठोरा येथे आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला यावल पंचायत समितीमधील अनेक विभागांच्या कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. यामुळे ‘सर्व योजनांचा लाभ एका छताखाली’ देण्याच्या या महत्त्वाच्या उपक्रमाला पंचायत समितीमधील ‘मुजोर कर्मचाऱ्यांनी’ पायदळी तुडवले का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या शिबिरात उपविभागीय अधिकारी बबन काकडे, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड आणि अनेक विभागांचे अधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे, रावेर-यावलचे आमदार अमोल जावळे यांनीही या शिबिराला हजेरी लावली होती. शिबिरादरम्यान आमदार जावळे यांनी घरकुल योजनेसंदर्भात प्रश्न उपस्थित केला आणि संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित आहेत का अशी विचारणा केली. त्यावेळी घरकुल विभागासह इतर अनेक विभागांचे कर्मचारी अनुपस्थित असल्याचे अधिकारी आणि आमदार महोदयांच्या निदर्शनास आले.
यावल पंचायत समितीमधील रोजगार हमी आणि पशुसंवर्धन हे दोन विभाग वगळता, इतर कोणताही विभाग या महत्त्वपूर्ण शिबिरात उपस्थित नव्हता. यामुळे नागरिकांना अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी एकाच ठिकाणी मिळणारी सुविधा नाकारली गेली. घरकुलाचा प्रश्न उपस्थित होत असताना, गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड स्वतः उपस्थित होत्या. त्याच वेळी, समोर बसलेल्या नागरिकांपैकी एकाने उठून यावल पंचायत समितीच्या कारभाराबाबत ग्रामस्थांची फिरवाफिरव होत असल्याची तक्रार थेट आमदार जावळे यांच्याकडे केली.
या प्रकारामुळे पंचायत समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड या अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘शासन आपल्या दारी’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी असे उपक्रम महत्त्वाचे असताना, कर्मचाऱ्यांची ही अनुपस्थिती नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे कारण ठरली आहे.