जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्य शासनाच्या “१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम” अंतर्गत, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव या कार्यालयाने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जळगावचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पुणे येथील यशदा येथे ३१ मे २०२५ रोजी झालेल्या अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत श्री. पाटील यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
या गौरव समारंभास मा. प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे (भा.प्र.से.), मा. आयुक्त श्री. ओमप्रकाश बकोरिया (भा.प्र.से.), तसेच मा. महासंचालक, बार्टी श्री. सुनील वारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
“१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम” ही राज्य शासनाने शासकीय कार्यालयांमध्ये पारदर्शकता, गतिशीलता, कार्यक्षमता आणि नागरिकाभिमुख सेवा देण्याच्या उद्देशाने सुरू केलेली एक अभिनव योजना आहे. या मोहिमेंतर्गत राज्यातील सर्व जिल्हा कार्यालयांची विविध निकषांवर तपासणी करण्यात आली. यात कार्यक्षम कारभार, वेळेत काम पूर्ण करणे, तांत्रिक साधनांचा वापर आणि कामकाजात पारदर्शकता हे प्रमुख निकष होते.
जळगाव जिल्ह्यातील सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाने सेवा वितरणात नवकल्पना राबवणे, डिजिटल प्रक्रियेचा प्रभावी वापर, वेळेवर योजनांची अंमलबजावणी आणि नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित कारवाई यामुळे राज्यातील इतर सर्व कार्यालयांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
या घवघवीत यशाबद्दल जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समाज कल्याण कार्यालयाचे अभिनंदन केले आहे. सहायक आयुक्त श्री. योगेश पाटील यांनी या यशामागे संपूर्ण कार्यालयीन टीमचे संघटन, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सेवाभाव असल्याचे सांगितले.
राज्य शासनाच्या वतीने अशा सुधारणा उपक्रमांमधून शासकीय यंत्रणांमध्ये सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील ही यशोगाथा इतर कार्यालयांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास मंत्री श्री. शिरसाठ यांनी यावेळी व्यक्त केला. यामुळे शासकीय कामकाजातील सुधारणांना अधिक गती मिळेल अशी अपेक्षा आहे.