यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील हिंगोणा गावाजवळून जाणाऱ्या बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर राज्य महामार्गावर रविवारी (१ जून) सायंकाळी सुमारे ६:३० वाजताच्या सुमारास दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला. या अपघातात दोन्ही मोटारसायकल चालक गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात अर्शद शेख सुपडू (रा. मिल्लत नगर, फैजपूर) हे त्यांच्या एमएच १९ डीएल १३०८ क्रमांकाच्या बजाज प्लेटिना मोटारसायकलने यावलहून फैजपूरच्या दिशेने जात होते. त्याचवेळी शिरसाड साखळी (ता. यावल) येथील पुरुषोत्तम रामभाऊ साळी हे एमएच १९ बीपी ८९४२ क्रमांकाच्या सीबीझेड एक्सटी मोटारसायकलने फैजपूरहून यावलच्या दिशेने येत होते. हिंगोणा गावाजवळ एका वळणावर दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. धडक एवढी भीषण होती की, दोन्ही चालक मोटारसायकलींवरून खाली फेकले गेले आणि त्यांना गंभीर दुखापती झाल्या.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी ११२ या पोलीस हेल्पलाईनवर संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच फैजपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी देविदास सूरदास, विकास सोनवणे, योगेश दुसाने आणि अरुण नमाईते यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली.