एरंडोल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील अवघ्या १३ वर्षांच्या तेजस गजानन महाजन या मुलाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली. खर्ची गावाजवळ त्याचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा खून नरबळीच्या संशयातून झाल्याची शक्यता वर्तवली जात असून, या प्रकरणी एरंडोल पोलिसांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा
तेजस महाजन हा आपल्या आई-वडील आणि मोठ्या बहिणीसोबत रिंगणगाव येथे राहत होता. त्याचे वडील गजानन महाजन शेतीसोबतच हार्डवेअरचे दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. सोमवार, १६ जून रोजी तेजसचे वडील जळगावला कामासाठी गेले असताना, त्यांनी तेजसला दुकानावर बसण्यास सांगितले होते. संध्याकाळी दुकान बंद करून तेजस घरी येणार होता, मात्र तो घरी पोहोचलाच नाही. नातेवाईकांनी तातडीने एरंडोल पोलीस ठाण्यात तेजस बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी तेजसचा शोध सुरू केला असता, आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास एरंडोल तालुक्यातील खर्ची गावाजवळील निंबाळकर यांच्या शेतात एका मुलाचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याची माहिती काही ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, तो मृतदेह बेपत्ता असलेल्या तेजस महाजनचाच असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेने महाजन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनास्थळी तात्काळ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल झाली असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, हा खून नरबळीच्या संशयातून करण्यात आल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. पोलिसांनी या दिशेने तपासाची सूत्रे फिरवली असून, तीन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. एरंडोल पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.