पारोळा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘दाम दुप्पट’ करून देण्याचे आमिष दाखवून बोलण्यात गुंतवून, दुचाकीच्या हँडलला लावलेली दीड लाख रुपये असलेली पिशवी लांबविल्याची धक्कादायक घटना बुधवारी (११ जून २०२५) दुपारी अडीच वाजता पारोळा तालुक्यातील चोरवड नाक्याजवळ घडली. याप्रकरणी दुपारी ३ वाजता पारोळा पोलीस ठाण्यात अनोळखी दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी काय घडली घटना?
आण्णा सकरू चव्हाण (वय ७२, रा. चबुत्रे, ता. पारोळा) हे ११ जून रोजी दुपारी पारोळा येथील बँकेत गेले होते. त्यांनी बँक खात्यातून दीड लाख रुपये काढले आणि त्यांचे मित्र प्रल्हाद बंडू चव्हाण यांच्यासोबत दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले. पारोळा तालुक्यातील चोरवड नाक्याजवळ ते धान्य घेण्यासाठी थांबले. यावेळी त्यांनी दीड लाख रुपये ठेवलेली पैशांची पिशवी दुचाकीच्या हँडलला लावली होती.
त्याच वेळी त्यांना दोन अनोळखी व्यक्ती भेटले. त्यांनी आण्णा चव्हाण यांना पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवले. त्याच क्षणी आण्णा चव्हाण यांना एक फोन आला आणि ते त्यावर बोलू लागले. या संधीचा फायदा घेत, त्या अनोळखी दोघांनी दुचाकीला लावलेली पैशांची पिशवी घेऊन पळ काढला.
गुन्हा दाखल, पोलीस तपास सुरू
पिशवीतील रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात येताच, आण्णा चव्हाण यांनी तात्काळ पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पारोळा पोलीस ठाण्यात अनोळखी दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल दुकळे करत आहेत. अशाप्रकारे फसवणूक करून पैसे लांबवणाऱ्या टोळ्यांपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.