जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी (३००व्या) जयंती महोत्सवानिमित्त जळगाव येथून काढण्यात आलेली भव्य ‘जागर यात्रा’ सायंकाळी गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या परिसरात पोहोचली. तब्बल ३०० किलोमीटर अंतर पार करून आलेल्या या यात्रेचा किवा तेवनमध्ये समारोप करण्यात आला. याप्रसंगी परिसरातील तरुणांनी रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त सहभाग घेऊन राजमाता अहिल्यादेवींना अनोखे वंदन केले.
या सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर विकास दूध फेडरेशनचे संचालक अरविंद देशमुख, अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानचे सुभाष सोनवणे, डॉ. नरेंद्र शिरसाट, नाना बोरसे, प्रभाकर न्याहळदे, रमेश सुलताने, दिलीप धनगर, संतोष दादा कचरे, सुभाष करे, ॲड. शरद न्याहाळदे, मल्हार सेनेचे प्रदेश सरचिटणीस संदीप तेले, अरुण ठाकरे, तसेच डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड आणि गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके, तुळशीराम सोनवणे, ॲड.ऋषिकेश सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली. तुळशीराम सोनवणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यानंतर अरविंद देशमुख आणि प्रमोद भिरुड यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली आणि या विशेष उपक्रमाचे कौतुक केले.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे डॉ. उल्हास पाटील रक्तपेढीतर्फे घेण्यात आलेले रक्तदान शिबिर. राजमातांच्या लोककल्याणकारी कार्याचा आदर्श समोर ठेवून, परिसरातील अनेक तरुणांनी या शिबिरात उत्स्फूर्तपणे रक्तदान करून राजमाता अहिल्यादेवींना आदराने नमन केले. डॉ. केतकीताई फाउंडेशनचेही या जागर यात्रेस मोलाचे सहकार्य लाभले.