अहमदाबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । गुजरातच्या अहमदाबादमध्ये आज गुरुवारी (१२ जून) एक भीषण विमान दुर्घटना घडली आहे. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाणारे एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलाइनर (AI171) हे ११ वर्षांचे जुने विमान उड्डाण भरताच कोसळले. या दुर्घटनेत विमानात असलेल्या २३० प्रवाशांसह १२ क्रू मेंबर्स (एकूण २४२ लोक) अशा सर्वांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. टेक ऑफ केल्यानंतर काही क्षणांतच हा अपघात घडला, ज्यामुळे विमानतळाजवळ मोठी हानी झाली.
माजी मुख्यमंत्री आणि उद्योगपतींचा समावेश : २० इंटर्न डॉक्टर दगावल्याची भीती
या दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश होता, ते आपल्या मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते. त्यांच्यासोबत कार्गो मोटरचे प्रमुख नंदा आणि ल्युबीचे संचालक सुभाष अमीन यांसारखे अनेक मोठे उद्योगपतीही विमानात होते. विमानतळाजवळ, जिथे विमान कोसळले ते मेघानी नगर येथील मेडिकल कॉलेज हॉस्टेलची मेस असल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात हॉस्टेलमधील २० इंटर्न डॉक्टरांचाही मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून शोक व्यक्त
या विमान अपघातावर दुःख व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “अहमदाबादमध्ये घडलेल्या या दुर्घटनेने आम्हाला स्तब्ध आणि दुःखी केले आहे. ही शब्दांच्या पलीकडची हृदयद्रावक घटना आहे. या दुःखद प्रसंगी, माझ्या संवेदना पीडितांसोबत आहेत. मी मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे, जे प्रभावित लोकांना मदत करण्यासाठी काम करत आहेत.” परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनीही या घटनेला “खूप दुःखद दुर्घटना” म्हटले असून, अनेक विदेशी नागरिकही यात सामील असल्याची माहिती दिली. बचावकार्य अद्याप सुरू असून, अचूक माहिती येण्यासाठी थोडा वेळ लागेल, असेही जयस्वाल यांनी स्पष्ट केले.
अपघाताचे कारण अज्ञात : तपास सुरू
बोईंग ७८७ ड्रीमलाइनर हे विमान ११ वर्षांचे जुने होते. या अपघातामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक बिघाड, मानवी चूक किंवा अन्य काही कारणामुळे ही दुर्घटना घडली याचा तपास आता संबंधित यंत्रणांकडून केला जाईल. या घटनेमुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.