शेगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । संत नगरी शेगावच्या भूमीवर आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यात रविकांत तुपकर यांनी आपल्या आक्रमक भाषणाने सरकारच्या धोरणांवर जोरदार ताशेरे ओढले. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने भरविण्यात आलेल्या या एल्गार सभेला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. कर्जमुक्ती, पीकविमा, नुकसानभरपाई आणि हमीभाव अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर तुपकरांनी थेट सरकारला इशारा दिला.
तुपकर म्हणाले की, राज्यभरात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र सरकारने अद्याप शंभर टक्के नुकसानभरपाई दिलेली नाही. ही अक्षम्य बेपर्वाई असून, शेतकऱ्यांचे तात्काळ पुनर्वसन होणे गरजेचे आहे. “लाखो शेतकरी अजूनही पीकविम्यापासून वंचित आहेत, ही लाजिरवाणी बाब आहे. विमा कंपन्या आणि सरकार यांच्या संगनमताने शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. याला आम्ही विरोध करतो आणि तात्काळ संरक्षण मिळावे, अशी आमची ठाम मागणी आहे,” असे तुपकर म्हणाले.
सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करावे, सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती मिळाली पाहिजे, या मागणीवर त्यांनी ठाम भूमिका मांडली. यासोबतच सोयाबीन आणि कापसाला प्रती क्विंटल ₹३००० चा हमीभाव पुन्हा लागू करावा, अशीही ठोस मागणी त्यांनी केली. “काही निवडक उद्योगसमूहांसाठी सरकार धोरण बदलते, मग शेतकऱ्यांसाठी का नाही?” असा थेट सवाल करत त्यांनी सरकारची दुटप्पी भूमिका उघड केली. जंगली जनावरांच्या हल्ल्यामुळे पिकांचे सातत्याने नुकसान होत आहे. यावर उपाय म्हणून शेताभोवती मजबूत कंपाऊंड आणि शेतमजुरांसाठी सुरक्षा व्यवस्था सरकारने उभी करावी, अशी मागणी त्यांनी केली. या भागातील शेतकऱ्यांचे व्यथित अनुभव त्यांनी लोकांसमोर मांडले आणि सरकारकडून मिळणाऱ्या प्रतिसादाच्या अभावावर नाराजी व्यक्त केली.
तुपकर यांनी सांगितले की, “गेल्या काही महिन्यांपासून आम्ही पश्चिम महाराष्ट्र, उत्तम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहोत. ठिकठिकाणी शेतकरी हवालदिल आहे. त्यांच्या डोळ्यांतून हतबलतेचे अश्रू दिसतात. हे चित्र बदलण्यासाठी आम्ही लढा देत आहोत.” शेवटी त्यांनी स्पष्ट शब्दांत सरकारला इशारा दिला की, “शेतकऱ्यांना हक्काची कर्जमुक्ती आणि पीकविमा मिळाला नाही, तर आम्ही मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. गरज पडल्यास सरकारच्या छाताडावर बसून कर्जमुक्ती मिळवून घेऊ.” त्यांच्या या घोषणेला उपस्थित हजारो शेतकऱ्यांनी जोरदार प्रतिसाद दिला.