जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रब्बी हंगाम २०२४-२५ अंतर्गत ज्वारी, मका आणि बाजरी या भरडधान्यांच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी ऑनलाईन नोंदणीची अंतिम तारीख १५ जून २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ९३३७ शेतकऱ्यांनी या योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे.
जळगाव जिल्ह्यात पणन महासंघामार्फत एकूण १८ खरेदी केंद्र कार्यरत राहणार आहेत. यात अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव, एरंडोल, पाळधी, म्हसावद, जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, शेंदुर्णी, पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव येथील केंद्रांचा समावेश आहे.
या भरडधान्यांची खरेदी ०१ जून २०२५ ते ३० जून २०२५ या कालावधीत केली जाईल. शेतकरी बांधवांनी ज्वारी, मका आणि बाजरी खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी आधारकार्ड, बँक पासबुक आणि ऑनलाईन पीकपेरा नोंद असलेला ७/१२ उतारा, ८अ इत्यादी कागदपत्रे घेऊन जवळच्या खरेदी केंद्रावर नोंदणी करावी.
मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, विभागीय संचालक संजय वामनराव सावकारे, संचालक संजय मुरलीधर पवार आणि एस. एस. मेने (प्र. जिल्हा पणन अधिकारी, जळगाव) यांच्या वतीने हे आवाहन करण्यात आले आहे.