जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर योजनेअंतर्गत जामनेर तालुक्यात एका विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जामनेर येथील माळी समाज मंगल कार्यालयात पार पडलेल्या या शिबिरात एकूण ४५१ लाभार्थ्यांना शासनाच्या विविध सेवा आणि योजनांचा थेट लाभ मिळाला.
या शिबिरात विविध शासकीय विभागांनी सहभाग घेतला. यामध्ये संजय गांधी योजना DBT प्रक्रियेद्वारे २३० लाभार्थ्यांना थेट आर्थिक मदत मिळाली, तर ॲग्रीस्टॅक अंतर्गत १० शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या. तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत ३५ विविध कृषी सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.
पुरवठा शाखेद्वारे ८९ लाभार्थ्यांना शिधापत्रिकेचा लाभ मिळाला. सेतू केंद्राच्या माध्यमातून १८ उत्पन्न दाखले, २१ जातीचे दाखले आणि २८ वय, अधिवास व रहिवास दाखले तातडीने वितरित करण्यात आले. याव्यतिरिक्त, इतर विभागांमार्फत २० लाभार्थ्यांना विविध सेवा पुरवण्यात आल्या. या शिबिरामुळे शेतकरी, गरीब आणि गरजू नागरिकांना शासनाच्या योजनांचा एकाच ठिकाणी लाभ घेता आला. नागरिकांनी महसूल मंडळ जामनेरच्या या उपक्रमाचे स्वागत केले असून, अशा शिबिरांमुळे प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ होते असे मत व्यक्त केले.