यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील चितोडा ते सातोद या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या काँक्रिटीकरण कामात मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप चितोडा गावाचे लोकनियुक्त सरपंच अरुण देवीदास पाटील यांनी केला आहे. या कामाची तात्काळ चौकशी करून गुणवत्ता सुधारण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
काय आहे नेमका आरोप?
सरपंच अरुण देवीदास पाटील यांनी आपल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की, चितोडा गावापासून सातोद गावापर्यंतच्या रस्त्याचे काम पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून सुरू आहे. मात्र, संबंधित ठेकेदार सुनील पाटील यांच्याकडून या कामात मोठ्या प्रमाणावर माती मिश्रित वाळू आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात आहे. यामुळे रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वापरण्यात येत असलेल्या साहित्यावरून पाहता, हा रस्ता येत्या काही दिवसांतच खराब होऊन जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
कामाची चौकशी करण्याची मागणी आणि आंदोलनाचा इशारा
सरपंच पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना या कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी करण्याची आणि योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत या कामाची वरिष्ठ पातळीवर चौकशी होत नाही, तोपर्यंत सदरचे काम थांबवण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. जर या कामाची तात्काळ चौकशी झाली नाही, तर आपण लोकशाही मार्गाने उपोषण करणार असल्याचा इशाराही सरपंच अरुण देवीदास पाटील यांनी दिला आहे. यामुळे या कामाच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाकडून काय कारवाई होते, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.