जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील आदिवासी भागातील बोरमढी येथील एका विवाहितेची रस्त्यावर प्रसूती झाल्याच्या गंभीर प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली आहे. या घटनेची त्रिस्तरीय चौकशी समितीद्वारे सखोल व पारदर्शक चौकशी करण्यात आली असून, चौकशीदरम्यान मिळालेले जबाब, उपकेंद्र कर्जाने येथील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोषी आढळलेल्या आरोग्य सेविका आणि कंत्राटी वाहन चालक यांच्यावर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी दिली आहे.
निष्पक्ष चौकशी प्रक्रिया:
डॉ. भायेकर यांनी सांगितले की, ही चौकशी प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने राबवण्यात आली. प्रकरणातील तक्रारदार प्रतिभा शिंदे यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी स्वतंत्र संधी आणि लेखी पत्राद्वारे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, वेळेत प्रतिसाद न आल्याने आणि चौकशी अहवाल सादर करण्यासाठी ठरवून दिलेल्या दोन दिवसांच्या मुदतीच्या मर्यादेत वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे चौकशी समितीने उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आपला अहवाल सादर केला.
प्रशासकीय कारवाईचे संकेत:
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “सदर प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह न ठेवता संबंधित १३ जणांचे जबाब, दस्तऐवज आणि घडलेली घटना यांच्या आधारे पारदर्शक पद्धतीने चौकशी करण्यात आली आहे. दोषी आढळलेल्या कर्मचाऱ्यांवर आवश्यक ती प्रशासकीय कारवाई निश्चित करण्यात आली आहे.”
जिल्हा प्रशासन नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजा आणि आपत्कालीन परिस्थितीतील सेवा यामध्ये कोणतीही शिथिलता सहन करणार नाही, असे स्पष्ट संकेत या कारवाईतून देण्यात आले आहेत. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना हाती घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. या कारवाईमुळे आरोग्य व्यवस्थेतील जबाबदारी आणि पारदर्शकतेवर भर दिला जात असल्याचे दिसून येते.