जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील महसूल मंडळ वाकडी अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाकडी येथे आज, २ जून २०२५ रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या संपन्न झाले. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शिबिराचे उद्घाटन तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या प्रास्ताविकाने झाले. आपल्या भाषणात त्यांनी शिबिराच्या उद्देशावर प्रकाश टाकला. “नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवणे आणि शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ गावातच उपलब्ध करून देणे हा या शिबिराचा मुख्य हेतू आहे,” असे ते म्हणाले.
या शिबिरात विविध विभागांनी नागरिकांना आपापल्या सेवा आणि योजनांचा थेट लाभ दिला. यात संजय गांधी निराधार योजनेच्या ७८ लाभार्थ्यांना डीबीटी प्रक्रियेअंतर्गत सेवा देण्यात आली, तर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने ६८ शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. पुरवठा विभागाने ६४ लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वाटप केले. सेतू केंद्रामार्फत ३२ उत्पन्न दाखले, ३८ जातीचे दाखले आणि ४० अधिवास व रहिवास दाखले वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत विभागाने १४ मनरेगा जॉब कार्डचे वाटप केले. अशा प्रकारे या शिबिरातून एकूण ३२० नागरिकांना थेट सेवा व लाभ देण्यात आले.
शिबिरात मिळालेल्या सेवेबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. “पूर्वी प्रमाणपत्रे, शिधापत्रिका किंवा योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेकदा सरकारी कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागत होते. मात्र या शिबिरामुळे सर्व सेवा गावातच मिळाल्याने आमचा वेळ आणि पैसा वाचला,” असे नागरिकांनी सांगितले. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शंकांचे तातडीने निरसन केले आणि अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.
या उपक्रमामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ गावपातळीवर त्वरित मिळाल्याने नागरिकांचा शासनावरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. यापुढेही अशा उपक्रमांद्वारे नागरिकांना सेवा देण्यात येईल, असा विश्वास तहसील कार्यालयाकडून व्यक्त करण्यात आला.