भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीवर मात करत, भुसावळ तालुक्यातील चोरवड गावातील सौरव संदीप दुबोले या तरुणाची भारतीय सैन्य दलात ‘अग्निवीर’ म्हणून निवड झाली आहे. मराठा इन्फंट्री बेळगाव येथे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून सौरव नुकताच आपल्या गावी परतला. यावेळी चोरवडकरांनी एकत्र येत, गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच सैन्यात दाखल झालेल्या या तरुणाचा अत्यंत उत्साहात सत्कार करत, भव्य मिरवणूक काढून त्याचे जल्लोषात स्वागत केले. सौरवची आता अरुणाचल प्रदेशात देशाची सेवा करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
जिद्द आणि परिश्रमाचे यश
सौरवचे वडील संदीप देविदास दुबोले हे रिक्षाचालक आहेत, तर आई शेतीच्या कामातून कुटुंबाला हातभार लावते. अशा आर्थिक अडचणी असतानाही सौरवने आपल्या ध्येयापासून माघार घेतली नाही. त्याने कठोर सराव केला आणि सैन्य दलात भरती होण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले. त्याच्या या यशामुळे चोरवड गावाचे नाव उंचावले आहे.
प्रशिक्षण पूर्ण करून सौरव गावी परतताच, संपूर्ण चोरवड गावात आनंदाचे वातावरण पसरले. गावातील मित्रपरिवार, नातेवाईक आणि सगेसोयरे यांनी मिळून त्याचे उत्स्फूर्त स्वागत केले. गावात ठिकठिकाणी सौरवच्या स्वागताचे पोस्टर लावण्यात आले होते, दारासमोर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या, घरोघरी दिवे लावून आणि फटाके वाजवून गावकऱ्यांनी आपला आनंद व्यक्त केला. सौरवच्या या यशामुळे चोरवड गावातील इतर तरुणांनाही प्रेरणा मिळाली आहे.