जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील प्रतिष्ठित शौर्यवीर ढोल-ताशा पथकाचा पाचवा वाद्यपूजन सोहळा रविवार, १ जून रोजी सायंकाळी ७ वाजता नूतन मराठा महाविद्यालय प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला. मराठी अस्मिता आणि पारंपरिक वाद्यसंगीताचे जतन करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या या पथकाच्या सोहळ्याला मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली होती.
या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून आ.सुरेश भोळे, जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे मीडिया व्हॉईस प्रेसिडेंट अनिल जोशी, नायब तहसीलदार रूपाली काळे, युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडिया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ढोल-ताशांच्या पारंपरिक वाद्यांचे पूजन करण्यात आले. या वेळी पथकातील वादकांनी आपल्या सुरेल आणि जोशपूर्ण वादनाने उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या दमदार वादनाने संपूर्ण प्रांगण ढोल-ताशांच्या गजराने दुमदुमून गेले.
सध्या शौर्यवीर पथकात १०५ मुले आणि ५५ मुली असे एकूण १६० वादक कार्यरत आहेत. गेल्या पाच वर्षांपासून हे पथक दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, शिवजयंती अशा विविध पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आपली कला सादर करत आहे. मराठी संस्कृती आणि परंपरा जपण्याचे काम हे पथक सातत्याने करत आहे. या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल नागरिकांचे आभार मानत, पथकाचे अध्यक्ष चिन्मय नाझरकर यांनी भविष्यातही असेच प्रेम आणि पाठबळ लाभावे अशी अपेक्षा व्यक्त केली. हा सोहळा जळगावच्या सांस्कृतिक परंपरेला अधिक समृद्ध करणारा ठरला.