जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विद्यार्थ्यांना शासकीय आणि नर्सिंग क्षेत्रातील विविध स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन मिळावे, तसेच त्यांची तयारी योग्य दिशेने व्हावी या उद्देशाने जळगाव येथील गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात एम्स (AIIMS), नॉरसेट (NORCET), डीएमईआर (DMER), एनएचएम (NHM), ईएसआयसी (ESIC), आरआरबी (RRB) यांसारख्या महत्त्वाच्या नर्सिंग स्पर्धा परीक्षांबद्दल सखोल माहिती देण्यात आली. यामध्ये संबंधित परीक्षांचा अभ्यासक्रम, तयारीची प्रभावी रणनीती, वेळेचे नियोजन, आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण यावर विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे योग्य तंत्र समजावून देण्यासाठी अनुभवी प्राध्यापक आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांचे विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते.
पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांची संकल्पना, त्यासाठीचे पात्रता निकष, नोकरीच्या उपलब्ध संधी आणि तयारीचे महत्त्व या विषयांवर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले, तसेच त्यांना नियोजनबद्ध अभ्यास करण्यासाठी आवश्यक टिप्सही देण्यात आल्या.
या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्य विशाखा रणवीर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य जसनीन दया, विविध विभागप्रमुख आणि प्राध्यापक वृंद उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळवण्यासाठी आवश्यक दिशा मिळेल, असे प्राचार्यांनी आपल्या भाषणात सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.