जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | काल रात्री आलेल्या वादळी पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडे आणि इलेक्ट्रीकचे खांब कोसळले असून यामुळे शहरातील अनेक भागातला विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. तर, यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक देखील विस्कळीत झाल्याचे दिसून आले.
काल रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास विजांच्या प्रचंड कडकडाटासह जोरदार पावसाने आगमन झाले. याच्या सोबत वादळी वारा देखील असल्याने काही मिनिटांमध्येच शहरातील अनेक भागांमध्ये अक्षरश: दाणादाण उडाल्याचे दिसून आले. राष्ट्रीय महामार्गावर आयटीआयच्या समोर आणि पोदार शाळेजवळ रस्त्यावर वृक्ष कोसळून पडल्याने हायवेवरील वाहतूक विस्कळीत झाली. रात्री उशीरा ही वाहतूक पुन्हा सुरू झाली.
दरम्यान, वादळी पावसामुळे शहराच्या अनेक भागांमध्ये झाडे कोसळली. तसेच महावितरणचे खांब देखील वाकले. यामुळे रात्रीपासून शहरातील बहुतांश भागांमध्ये वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. काही भागात रात्री उशीरा वीज पुरवठा सुरू झाला असला तरी सकाळपर्यंत बऱ्याच भागांमधील वीज गायब असल्याचे दिसून आले. वादळामुळे अनेक घरांवरील पत्रे देखील उडून गेली असून यामुळे मोठी आर्थिक हानी झाली आहे.
सुमारे पाऊण तासापर्यंत जोरदार वादळी पावसाने शहरासह परिसराला झोडपले असून यामुळे मोठी वित्त हानी झाली आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वत: शहरातील अनेक भागांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली. आपत्ती निवारण विभागाचे प्रमुख गजेंद्र पातोळे यांनी देखील पाहणी करून मदतकार्य केले.