जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बालवयातील दुर्मिळ आणि जीवघेणा समजला जाणारा ‘प्रेस सिंड्रोम’ (PRES Syndrome) या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या एका सहा वर्षांच्या बालकावर जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील बालरोग तज्ज्ञांनी यशस्वी उपचार करून त्याचे प्राण वाचवले आहेत. ही वैद्यकीय कामगिरी जिल्ह्यातील आरोग्य सेवेसाठी अत्यंत उल्लेखनीय मानली जात आहे, ज्यामुळे एका निरागस जीवाला नवजीवन मिळाले आहे.
मुर्तुझा शेखची गंभीर स्थिती
चोपडा येथील मुर्तुझा शेख (वय १०) हा बालक अत्यवस्थ स्थितीत डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल झाला होता. त्याला सतत झटके येत होते, संपूर्ण शरीराला सूज आली होती आणि रक्तदाबही खूप वाढलेला होता. श्वास घेण्यास त्याला प्रचंड अडचण येत होती, काही वेळा त्याची शुद्धही हरपत होती. याशिवाय, त्याच्या किडनीच्या कार्यक्षमतेवरही गंभीर परिणाम झाला होता. अशा स्थितीत विलंब न करता त्याला डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाच्या बालरोग अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.
तज्ज्ञांच्या टीमकडून तातडीने उपचार
रुग्णालयातील बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. अनंत बेंडाळे, डॉ. उमाकांत अणेकर आणि डॉ. सुयोग तन्नीरवार यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञांच्या टीमने तातडीने मुर्तुझावर उपचार सुरू केले. सर्वप्रथम बालकाची एमआरआय चाचणी करण्यात आली, ज्यामध्ये त्याच्या मेंदूतील सूज स्पष्टपणे दिसून आली. विविध रक्ताच्या तपासण्या केल्या असता किडनी निकामी होण्याच्या लक्षणांची पुष्टी झाली. या सर्व तपासण्यांमधून त्याला ‘प्रेस सिंड्रोम’चे निदान झाले.
‘प्रेस सिंड्रोम’ हा मेंदूतील रक्तवाहिन्यांमधील दबाव वाढल्यामुळे होणारा आजार आहे, ज्यामुळे मेंदूत सूज येते. यातून झटके येणे, शुद्ध हरपणे, भ्रम, दृष्टिदोष आणि इतर अनेक न्यूरोलॉजिकल त्रास होऊ शकतात. मुर्तुझाचे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होते, कारण त्याला किडनीचा आजार असल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवणे अत्यंत अवघड होते.
८ दिवसांच्या उपचारानंतर सुधारणा
रुग्णालयातील डॉक्टरांनी मुर्तुझाला औषधोपचारासोबतच आवश्यक असलेले द्रव आहार व्यवस्थापन, अँटी-एपिलेप्टिक औषधे आणि विशेष पद्धतीने रक्तदाब नियंत्रित करणारी औषधे दिली. सातत्याने एमआरआय व इतर तपासण्या करून मेंदूतील सूज कमी होत आहे का, यावर बारकाईने निरीक्षण ठेवण्यात आले. सुमारे आठ दिवसांच्या अथक उपचारांनंतर बालकाची स्थिती सुधारू लागली. त्याला येणारे झटके पूर्णपणे थांबले, शरीरावरील सूज कमी झाली आणि त्याला पूर्णपणे शुद्ध परत आली. या यशस्वी उपचारासाठी डॉ. चंदाराणी देगूलरकर, डॉ. कुशल धांडे, डॉ. नीरज जगताप, डॉ. अभिजीत अरमाड आणि सर्व परिचारिकांनी मोलाचे सहकार्य केले.
डॉ. चंदाराणी देगूलरकर यांनी सांगितले की, “लहान मुलांना अचानक झटके, शुद्ध हरपणे, सूज येणे, अशक्तपणा अशी लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा. ‘प्रेस सिंड्रोम’ हा आजार वेळेत ओळखल्यास उपचारक्षम असतो, पण उपचारात उशीर झाल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात.” या यशामुळे डॉ. उल्हास पाटील रुग्णालय जिल्ह्यातील आरोग्य सेवेत आपले महत्त्व सिद्ध करत आहे.