जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आज सकाळी एक नजरेत भरणारी आणि हृदयस्पर्शी घटना घडली. एका नागरिकाने वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य वासुदेव वाढे यांना माहिती दिली की, रुग्णालयाच्या गेटजवळील 100 फूट उंच झाडावर एका पक्ष्याचा पतंगाच्या मांजात अडकून जीव अडकलाय. ही माहिती मिळताच वाढे यांनी तात्काळ परिसरात धाव घेतली आणि पाहणी केली असता, सदर पक्षी हा शिक्रा या शिकारी जातीचा असल्याचे समोर आले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा पक्षी तब्बल सहा ते सात दिवसांपासून त्या उंच झाडावर अडकून होता.
इतक्या उंचीवर अन्न-पाण्याविना अडकलेल्या या मुक्या जीवाची अवस्था अतिशय दयनीय झाली होती. वासुदेव वाढे आणि त्यांचे सहकारी योगेश गालफाडे यांनी तातडीने महापालिकेच्या अग्नीशमन विभागाशी संपर्क साधून मदत मागितली. विभागानेही वेळ न घालवता हायड्रॉलिक अग्निशमन गाडी घटनास्थळी पाठवून रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. योग्य समन्वय, दक्षता आणि कुशलतेने अग्नीशमन कर्मचाऱ्यांनी झाडावर चढून त्या पक्ष्याला जिवंत आणि सुखरूपपणे खाली आणण्यात यश मिळवले.
इतक्या दिवस अन्न व पाण्यावाचून अडकलेल्या या पक्ष्याची प्रकृती खालावलेली होती. त्यामुळे त्याला तात्काळ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश चोपडे यांच्याकडे उपचारासाठी नेण्यात आले. डॉ. चोपडे यांनी तातडीने उपचार करून पक्ष्याला नवजीवन दिले आणि त्यानंतर तो पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आला.
या संपूर्ण रेस्क्यू मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अग्नीशमन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी — अश्वजीत घरडे, शशिकांत बारी, देवा सुरवाडे आणि कंखरे — यांनी दिलेल्या समर्पित सेवेमुळे एक दुर्मीळ पक्ष्याचा जीव वाचला. वन्यजीव संरक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे.