रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून गुरांची बेकायदेशीर तस्करी थांबण्याचे नाव घेत नाहीये. आज पुन्हा एकदा पोलिसांनी अभोडा ते मोरव्हाल रस्त्याने कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे वाहतूक करत असलेल्या तीन गोवंश प्राण्यांची सुटका करत, त्यांना वाहून नेणाऱ्या टाटा मॅजिक वाहनावर यशस्वी कारवाई केली आहे.
पोलिस निरीक्षकांच्या गुप्त माहितीवरून कारवाई
रावेर पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना गुरांची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीची गंभीर दखल घेत त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, पोलीस हेड कॉन्स्टेबल ईश्वर चव्हाण, जगदीश पाटील आणि इस्माईल तडवी यांच्या पथकाने अभोडा-मोरव्हाल रस्त्यावर सापळा रचला.
निर्देयीपणे कोंबलेल्या अवस्थेत गोवंश आढळले
सापळा रचलेल्या ठिकाणी एमएच १५ बीजे २९४२ क्रमांकाच्या टाटा मॅजिक वाहनाला थांबवण्यात आले. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता, त्यात एक बैल आणि दोन गोऱ्हे अत्यंत निर्दयीपणे दोरीने बांधून कोंबलेल्या अवस्थेत आढळले. त्यांची वाहतूक कत्तलखान्याकडे केली जात असल्याचे स्पष्ट झाले.
गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत वाहनासह सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल इस्माईल तडवी यांच्या फिर्यादीवरून आरोपी रशीद नथ्थू तडवी (रा. मोरव्हाल) याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेर पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. गुरांची तस्करी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक कठोर पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.