जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मास्टर कॉलनीतील कसाई गल्लीत कचरा संकलित करणाऱ्या एका वाहनात गोवंशाची कत्तल करून त्याचे शिंग, जबडा आणि कातडे फेकल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी दुपारी उघडकीस आला. वाहन चालकाच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर, हिंदुत्ववादी संघटनांनी हे वाहन अडवून पोलीस ठाण्यात आणले. यामुळे पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणात जमाव जमल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने बकरी ईदनिमित्त कुर्बानीच्या कचरा संकलनासाठी ७ ते ९ जूनपर्यंत १३ वाहने उपलब्ध करून दिली होती. त्यानुसार, वॉटर ग्रेस कंपनीचे सुपरवायझर ऋषिकेश राजेश शिंपी यांनी रविवारी सकाळी मनपाचे कचरा संकलन वाहन (एमएच १९, एम, ९३८९) मास्टर कॉलनीतील बॉम्बे बेकरी येथे लावून कचरा भरून डेपोत नेण्यास चालक गजानन गोपाल गवळी यांना सांगितले. दुपारी ३ च्या सुमारास गवळी आपले वाहन कचरा डेपोत खाली करत असताना, तिथेच असलेल्या दुसऱ्या वाहनातील (एमएच १९, एम, ९३८५) चालकांनाही त्यांच्या वाहनात अज्ञात व्यक्तीने कच्चे मांस, वेगवेगळ्या आकाराची शिंगे, जाड कातडे आणि जनावरांचा जबडा फेकल्याचे दिसले.
या प्रकाराची माहिती तात्काळ तालुका पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही वाहने तालुका पोलीस ठाण्यात आणली. वाहनात सापडलेल्या मांसाची तपासणी करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी संजय धांडे आणि पशुधन विकास अधिकारी डॉ. अतुल नेहते यांना बोलावण्यात आले. त्यांनी मांसाचे नमुने तपासणीसाठी घेतले असून, त्याची तपासणी केली जाणार आहे.
कचरा संकलित करणाऱ्या वाहनातून गोमांसाची विल्हेवाट लावली जात असल्याची माहिती शहरात पसरताच हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तालुका पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. मांस असलेले वाहन पोलीस ठाण्याच्या आवारात आणल्यानंतर, सुरुवातीला पोलिसांनी हे प्रकरण एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याचे सांगितले. मात्र, जमावाने हे वाहन आपल्या हद्दीत पकडल्याने गुन्हा इथेच दाखल करण्याची मागणी लावून धरली. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप जमावाने केला. अखेर, सायंकाळी उशिरा वाहन चालकाच्या फिर्यादीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.