जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव-भुसावळ रस्त्यावर चांडक हॉस्पिटलजवळ ११ जून रोजी रात्री आलेल्या वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर कोसळलेल्या सर्व्हिस वायर दुरुस्तीचे काम एमएसईबी (महावितरण) कडून हाती घेण्यात आले होते. याच दरम्यान, जळगावकडून भुसावळकडे जाणारी आणि भुसावळकडून जळगावकडे येणारी वाहतूक दोन्ही बाजूंनी थांबवण्यात आली होती. मात्र, काम वेळेत पूर्ण न झाल्याने वाहतूक सुमारे दीड ते दोन किलोमीटरपर्यंत ठप्प झाली होती.
नियोजनाअभावी वाहनधारकांना नाहक त्रास
दुरुस्तीचे काम पूर्ण न झाल्याने केबल तात्पुरती बाजूला करून काम थांबवण्यात आले आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली. परंतु, वाहतुकीचे पूर्व नियोजन नसल्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागला. अचानक वाहतूक थांबवल्याने आणि पर्यायी व्यवस्थेची माहिती नसल्याने अनेक वाहनचालक अडकून पडले होते.
वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती
या वाहतूक कोंडीच्या वेळी शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी नाहरसिंग पाडवी, भूषण मोरे, पवार आणि पीएसआय रमेश सोनवणे व त्यांचे सहकारी उपस्थित होते. त्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला, मात्र वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीमुळे आणि दुरुस्तीच्या कामामुळे त्यांनाही मर्यादा आल्या.