जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महान क्रांतिकारक आणि आदिवासी समाजाचे लोकनायक बिरसा मुंडा यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जळगाव भाजप जिल्हा कार्यालयात आदरांजली वाहण्यात आली. जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी डॉ. राधेश्याम चौधरी यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकत, त्यांचे कार्य आणि बलिदान प्रेरणादायी असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “बिरसा मुंडा यांचा जन्म १८७५ मध्ये झारखंडमधील उलिहातू गावात झाला. बालपणी दारिद्र्य अनुभवले असले तरी, त्यांनी शिक्षण घेतले आणि आपल्या समाजावर होणाऱ्या अन्यायाची त्यांना तीव्र जाणीव झाली. ब्रिटिश राजवट आणि स्थानिक जमीनदारांकडून आदिवासी समाजाचे होणारे शोषण, जमिनी बळकावणे, पारंपरिक अधिकारांवर गदा आणणे आणि गुलामांसारखी वागणूक यामुळे त्यांनी ‘उलगुलान’ अर्थात ‘महान क्रांती’ची हाक दिली.”
चौधरी यांनी पुढे सांगितले की, “बिरसा मुंडा यांनी ‘अबुआ राज एटे जाना, महारानी राज टुंडू जाना’ (आमचे राज्य येईल, राणीचे राज्य संपुष्टात येईल) हा नारा देत आदिवासींना एकत्र आणले आणि त्यांच्या हक्कांबद्दल जागृत केले. त्यांनी केवळ राजकीय स्वातंत्र्यासाठीच नव्हे, तर दारूबंदी, अंधश्रद्धा निर्मूलन आणि स्वच्छतेचा संदेश देत सामाजिक व धार्मिक सुधारणांवरही भर दिला.”
बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली, आदिवासींनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध अनेक लढाया दिल्या. त्यांनी पारंपरिक धनुष्यबाण आणि कुऱ्हाडीने ब्रिटीश सैन्याच्या बंदुकांना आव्हान दिले. ३ फेब्रुवारी १९०० रोजी त्यांना अटक झाली आणि ९ जून १९०० रोजी प्लेगने त्यांचे निधन झाले, असे सांगितले जाते. वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी या महान क्रांतिकारकाने जगाचा निरोप घेतला.
आजही बिरसा मुंडा हे आदिवासी समाजासाठी आणि संपूर्ण देशासाठी प्रेरणास्रोत आहेत. त्यांच्या बलिदानातून मिळालेली प्रेरणा घेऊन सशक्त, समतावादी आणि न्यायपूर्ण समाज घडवण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन डॉ. चौधरी यांनी केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्यासह जनजाती मोर्चा जिल्हाध्यक्ष राजू सोनवणे, अरविंद भाऊ देशमुख, गोपाल भाऊ भंगाळे, मिलिंद भाऊ चौधरी, भाऊसाहेब पाटील, पुंडलिक सपकाळे, विठ्ठल काका कोळी, समाधान सपकाळे, समाधान कोळी, अरविंद भाऊ सपकाळे, राजू सपकाळे, मनीष सपकाळे, विजय सोनवणे, सुभाष पवार, समाधान ठाकूर, मधुकर पवार, विजय अहिरे, रामसिंग ठाकरे, रावसाहेब ठाकरे, रघु चव्हाण, प्रवीण पाटील, निवृत्ती पाटील, गिरीश वराडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.