वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव येथील राष्ट्रीय महामार्गावरील वेस्टर्न हॉटेलजवळ रविवारी, १५ जून रोजी पहाटे ३ वाजता एक भीषण तिहेरी अपघात घडला. या अपघातात ट्रक, पिकअप वाहन आणि प्रवासी रिक्षा यांचा समावेश होता. या दुर्घटनेत पिकअप वाहन चालक राजू गुलाब अवतारी (रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी सकाळी १० वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघाताची सविस्तर माहिती
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रविवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास, भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक क्रमांक (एमएच ३७ टी ६७७१) ने पुढे जाणाऱ्या पिकअप वाहन क्रमांक (एमएच १९ सीवाय ४५७६) आणि प्रवासी रिक्षा क्रमांक (एमएच १९ सीडब्ल्यू २९५०) या दोघांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये पिकअप वाहनावरील चालक राजू गुलाब अवतारी यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
रिक्षा चालक जखमी, ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल
या अपघातात रिक्षा चालक अमोल ज्ञानेश्वर चौधरी (वय ३३, रा. तेलीवाडा, ता. वरणगाव) हे देखील जखमी झाले आहेत. रिक्षा चालक अमोल चौधरी यांनीच वरणगाव पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून, ट्रकवरील चालक अजहर खान सखाउल्ला खान (रा. समता नगर, कारंजा लाड, जि. वाशिम) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ प्रेमचंद सपकाळे करीत आहेत. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.