अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे पैशांच्या वादातून दोन सख्ख्या भावांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना २९ मे रोजी रात्री ८.३० वाजता घडली. या प्रकरणी, उपचारांनंतर दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी (३ जून) सायंकाळी ७ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश श्यामसिंग प्रजापती (वय ४२) आणि त्यांचा भाऊ कैलास श्याम सिंग प्रजापती (दोघेही राहणार मध्यप्रदेश) हे अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील एका सहकारी सोसायटीच्या गोडाऊनमध्ये झोपलेले होते. यावेळी त्यांच्यासोबत काम करणारे सलीम उर्फ संदीप दुर्वे, गोपाळ दुर्वे, साहूलाल धुर्वे, पंकज शेलु उमराव सिंग आणि शिवम फुलसिंग (सर्व राहणार छिंदवाडा राज्य मध्य प्रदेश) यांनी पैशांवरून वाद घालण्यास सुरुवात केली.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी राजेश प्रजापती आणि कैलास प्रजापती या दोन्ही भावांना शिवीगाळ करत पाईप आणि लोखंडी पहारीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच, दोघांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या दोन्ही भावांना तातडीने अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर आवश्यक उपचार पूर्ण झाल्यानंतर, राजेश प्रजापती यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल विजय भोई हे करत आहेत. पैशांवरून झालेल्या या गंभीर प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.