जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सण-उत्सवांच्या काळात संभाव्य गैरप्रकार आणि वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी कंबर कसली आहे. याच अनुषंगाने, अवैध गावठी कट्टे विक्रीसाठी आलेल्या दोन इसमांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून शिताफीने अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे, दोन मोटारसायकली आणि दोन मोबाईल हँडसेट असा एकूण १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेला शस्त्रबंदीसंदर्भात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. याच सूचनांनुसार, ८ जून २०२५ रोजी सहाफी रवी नरवाडे आणि पोहेकॉ गोपाळ गव्हाळे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातून दोन व्यक्ती गावठी कट्टे विक्री करण्याच्या उद्देशाने पाल, ता. रावेरमार्गे महाराष्ट्रात येणार आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी तात्काळ पोउपनिरी शरद बागल, सहाफी रवी नरवाडे, पोहेकॉ गोपाळ गव्हाळे, पोहेकॉ नितीन बाविस्कर, पोकॉ बबन पाटील आणि चापोहेकॉ दीपक चौधरी यांचे पथक तयार केले. या पथकाने रावेर पोलीस स्टेशन अंतर्गत पाल दूरक्षेत्राजवळील जंगल परिसरात सापळा रचला.
सापळा लावून थांबलेले असताना, अंदाजे ४५ वर्षीय व्यक्ती काळ्या रंगाच्या टीव्हीएस रायडर मोटारसायकलवर (क्र. MP-१०-ZC-९६५०) आणि निळ्या पगडीत दिसला, तर दुसरा अंदाजे २५ वर्षीय व्यक्ती काळ्या रंगाच्या टीव्हीएस स्पोर्ट मोटारसायकलवर (क्र. MP-१०-MV-१४६२) येताना दिसला. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करताच, त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करून, दोन्ही रस्त्यांवर लावलेल्या सापळ्यात या दोघांनाही शिताफीने ताब्यात घेतले.
अंगझडतीमध्ये त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे गोविंदसिंग ठानसिंग बरनाला (वय ४५, रा. सीरवेल महादेव, ता. भगवानपुरा, जि. खरगोन, मध्यप्रदेश) आणि निसानसिंग जिवनसिंग बरनाला (वय २३, रा. उमटी, ता. वरला, जि. बडवाणी, ह.मु. सीवेल महादेव, ता. भगवानपुरा, मध्यप्रदेश) अशी आहेत. त्यांच्यावर रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना रावेर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनिरी तुषार पाटील, रावेर पोलीस स्टेशन, करत आहेत.