यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग (NH 753B) च्या चौपदरीकरणाचे काम आता शेवटच्या टप्प्यात आले आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि या कामामुळे शेतकरी तसेच स्थानिक नागरिकांना येत असलेल्या समस्या जाणून घेण्यासाठी आज केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली यावल (फैजपूर) येथे एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या महामार्गाच्या २४० किलोमीटर अंतराच्या चौपदरीकरणास मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित कामाला गती मिळाली आहे. तथापि, प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमीन संपादनासह इतर काही बाबींमुळे अनेक शेतकरी आणि स्थानिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
यावेळी बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार अमोल हरीभाऊ जावळे, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी बबन काकडे, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर आणि स्थानिक प्रशासनातील अन्य अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत उपस्थित शेतकरी आणि नागरिकांच्या समस्या व मागण्या सविस्तरपणे ऐकून घेण्यात आल्या. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी या सर्व समस्यांवर तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याचे आणि संबंधित विभागांकडून या प्रकरणी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. या निर्णयामुळे महामार्ग बाधित शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या बैठकीस भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच चोपडा, यावल आणि रावेर तालुक्यातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यावर परिसरातील वाहतुकीची कोंडी कमी होऊन प्रवासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.