जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने (क.ब.चौ.उ.म.वि.) ‘द वीक-हंसा संशोधन सर्वेक्षण २०२५’ मध्ये देशातील शासकीय बहुविद्याशाखीय विद्यापीठांमध्ये ३९ वे स्थान पटकावून लक्षणीय प्रगती केली आहे. गेल्या वर्षी ५० व्या स्थानावर असलेल्या या विद्यापीठाने अवघ्या एका वर्षात १२ स्थानांनी मजल मारली आहे, ही एक कौतुकास्पद कामगिरी आहे.
राज्य आणि विभागीय स्तरावरही उत्कृष्ट कामगिरी
‘द वीक-हंसा’ ही ग्राहक केंद्रित बाजार सर्वेक्षण करणारी संस्था असून, त्यांनी देशभरातील विद्यापीठांच्या कार्याचे त्रयस्थ पद्धतीने सर्वेक्षण करून हा अहवाल तयार केलेला आहे. या अहवालानुसार, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ देशपातळीवर ३९ व्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये या विद्यापीठाने तिसरे स्थान मिळवले आहे. याशिवाय, राज्य बहुविद्याशाखीय विद्यापीठांमधून विद्यापीठाने २४ वे स्थान तर पश्चिम विभागीय विद्यापीठांमध्ये ९ वे स्थान प्राप्त करून आपले यश सिद्ध केले आहे. या सर्वेक्षणात विद्यापीठाचे वय, प्राप्त नॅक श्रेणी, भौतिक सुविधा, शिक्षण, शिक्षक, संशोधन यांच्यातील गुणवत्ता, विद्यार्थी संख्या, विद्यार्थ्यांना मिळणारे प्रोत्साहन तसेच समाज माध्यमात विद्यापीठाची असलेली प्रतिमा आदी विविध बाबी विचारात घेतल्या जातात.
कुलागुरूंच्या नेतृत्वात सर्वांच्या सहकार्याने यशाचा ठसा
कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली, प्र-कुलगुरू, व्यवस्थापन परिषद सदस्य, विद्या परिषद, अधिसभा सदस्य, प्रशाळा संचालक, शिक्षक, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे विद्यापीठाने ही उल्लेखनीय कामगिरी साधली आहे. गेल्या वर्षभरात विद्यापीठाने केलेले संशोधन, गुणवत्तापूर्ण अभ्यासक्रम, नवनवीन प्रयोग, विद्यार्थी केंद्रित उपक्रम, परीक्षांचे सुनियोजन आणि ४५ दिवसांच्या कालावधीत जाहीर केलेले परीक्षा निकाल यामुळे विद्यापीठाने यशाचा ठसा उमटवला आहे. विद्यार्थ्यांना दिलेल्या सुविधा आणि संशोधन प्रकल्पांना मिळालेले प्रोत्साहन यांसारख्या बाबींनीही या यशात महत्त्वपूर्ण भर घातली आहे. या सर्वेक्षणाचा सविस्तर अहवाल www.theweek.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी दिली.