अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेतून दिवसाढवळ्या तीन लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची धक्कादायक घटना मंगळवारी, १० जून रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. आंब्याची खरेदी करत असताना अज्ञात चोरट्यांनी दुचाकीच्या हँडलला लावलेली पैशांची पिशवी लंपास केली. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
शिवाजी भानुदास पाटील (वय ५९, रा. वासरे, ता. अमळनेर) हे आपल्या कुटुंबासह वासरे येथे वास्तव्यास असून, शेती करून उदरनिर्वाह करतात. मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास शिवाजी पाटील आपल्या दुचाकीने अमळनेर शहरात आले होते. बाजारपेठेतील विजय शॉपीसमोरील एका हातगाडीवर ते आंबे खरेदी करत होते. यावेळी त्यांनी तीन लाख रुपये रोख असलेली एक पिशवी आपल्या दुचाकीच्या हँडलला टांगली होती. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी ती पिशवी हातोहात चोरून नेली.