जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । संत बाबा गुरुदासराम चॅरिटेबल ट्रस्टच्या नेत्रज्योति हॉस्पिटल, बाबा गरीबदास परिवार यांच्या वतीने संत बाबा गुरुदासराम साहेब यांच्या ९४ व्या जन्मोत्सवानिमित्त भव्य निःशुल्क नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू फेको शस्त्रक्रिया शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. रविवार, १५ जून रोजी सकाळी शिबीराचे उद्घाटन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले.
नेत्र तपासणी व मोफत शस्त्रक्रिया
या शिबिरात नामांकित नेत्ररोग तज्ञ डॉ. शिरीष पाटील, डॉ. हीरा जोशी, डॉ. तुषार बोंबटकर आणि डॉ. रेवती महाजन यांनी रुग्णांची तपासणी केली. शिबिरात निवडलेल्या गरजू रुग्णांवर १६ जून २०२५ ते ३० जून २०२५ या कालावधीत मोफत ‘ऑक्ररी फोल्ड लेन्स’ टाकून फेको शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, ज्या रुग्णांकडे पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका (रेशन कार्ड) आणि उत्पन्नाचा दाखला असेल, अशा रुग्णांना ही मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया उपलब्ध करून देण्यात येत आहे.
मोफत रक्त तपासणी व अन्य सुविधा
मोतीबिंदूसाठी निवडलेल्या रुग्णांना आवश्यक रक्त तपासणी देखील मोफत करण्यात आली. डॉ. तुषार बोरोले यांच्या तुषार पॅथॉलॉजी लॅबच्या सहकार्याने ही सुविधा पुरवण्यात आली. शिबिरात सहभागी रुग्णांसाठी आणि त्यांच्या सोबत आलेल्या नातेवाईकांसाठी राहण्याची, चहा, नाश्ता आणि जेवणाची मोफत सोय करण्यात आली होती, ज्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला.
रक्तदान आणि इतर आरोग्य तपासणी
याच दिवशी सकाळी ९:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढीच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. आरोग्य सेवेत दंत विभागात डॉ. वर्षा रंगलानी, डॉ. सुप्रिया कुकरेजा, डॉ. स्नेहल जाधव, डॉ. ट्विंकल तलरेजा, आणि डॉ. निकिता मंधवाणी यांनी मोफत दंत तपासणी केली. तर डॉ. मोहनलाल साधरिया यांनी सामान्य तपासणी केली.
आयुर्वेदिक तज्ञांचे मार्गदर्शन
या शिबिराचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, संपूर्ण महाराष्ट्रात नामांकित असलेले आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. महेश बिर्ला, डॉ. अमृता कुकरेजा आणि डॉ. अनिल प्रिन्स यांनी मोफत आयुर्वेदिक तपासणी व मार्गदर्शन केले. तसेच, रुग्णांसाठी अल्प दरात औषधी आणि पंचकर्म चिकित्सा उपलब्ध करून दिली.
ट्रस्टचे आवाहन
संत बाबा गुरुदासराम चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. गुरुमुख जगवानी, उपाध्यक्ष श्री. दिलीपकुमार मंघवानी, सेक्रेटरी धनराज चावला आणि सर्व ट्रस्टीगण यांनी सर्व समाजातील रक्तदात्यांना स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच, जास्तीत जास्त संख्येने रुग्णांनी या मोफत तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहनही करण्यात आले होते, ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला.