जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरातील नागरिकांना येण्या-जाण्यासाठी ब्राह्मण संघाच्या सभागृहासमोर प्रस्तावित असलेल्या बोगद्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय सल्लागार समितीचे सदस्य विराज कावडिया यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीणा यांच्याकडे केली आहे. जळगाव महापालिका आणि नागरिकांनी यापूर्वीही रेल्वे प्रशासनाला याबाबत अनेकदा पत्र दिले आहे.
मध्य रेल्वेतर्फे क्षेत्रीय रेल्वे सल्लागार समितीची १२६वी बैठक गुरुवारी (५ जून २०२५) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे झाली. या बैठकीत मध्य रेल्वे क्षेत्रातील विविध प्रश्न मांडण्यात आले. जळगाव रेल्वे स्थानकातील नवीन इमारत, सरकते जिने, प्लॅटफॉर्म आणि वाहनतळ यासारख्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. रेल्वे अधिकाऱ्यांनी ही कामे २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी प्रवाशांच्या सोयीसाठी २२११८ अमरावती-पुणे ही साप्ताहिक गाडी नियमित करण्याची मागणी करण्यात आली, कारण भुसावळ-जळगावरून पुण्याला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या कमी आहे. रेल्वे बोर्डाला याबाबत विनंती केली असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले. तसेच, अमरावती-मुंबईच्या रेल्वे गाडीचे कमी केलेले स्लीपर कोच वाढविणे, ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात ५० टक्के सवलत पुन्हा सुरू करणे यासह विविध मागण्या बैठकीत मांडण्यात आल्या.
महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर:
जळगाव रेल्वे स्थानकावर महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आला. दररोज हजारो प्रवासी, त्यात मोठ्या संख्येने महिला येत-जात असताना, रेल्वे पोलीस दलात केवळ एकच महिला पोलीस कर्मचारी कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. जळगाव हे मध्य रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असून, येथून दिवसाला १०९ रेल्वे गाड्या जातात. त्यामुळे मोठ्या संख्येने महिला प्रवासी रात्रीच्या वेळीही प्रवास करतात.
याबाबत मध्य रेल्वे मुख्य सुरक्षा आयुक्त सुरेंद्रनाथ चौधरी यांना निवेदनाद्वारे जळगाव रेल्वे स्थानकामध्ये महिला रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी विराज कावडिया यांनी केली. रात्रीच्या वेळी शिवाजीनगर, हुडको, गेंदालाल मिल परिसरातील टवाळखोरांचा प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर अधिक धोका असतो, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.