मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगरच्या राजकारणातील एक मातब्बर व्यक्तीमत्व म्हणून ख्यात असणारे विनोद तराळ यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश घेतला. मुंबईत पार पडलेल्या या प्रवेश सोहळ्यात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
मूळचे मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील रहिवासी असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच ‘माफदा’ संस्थेचे प्रदेशाध्यक्ष विनोद तराळ हे आजवर शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ होते. पक्षात फूट पडली तरी देखील ते शरद पवार यांच्या सोबतच राहिले होते. मात्र गेल्या आठवड्यात ते पक्षांतर करून शिवसेना शिंदे गटात दाखल होणार असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली होती. या संदर्भात ‘लाईव्ह ट्रेंडस न्यूज’ने तराळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत स्पष्ट भाष्य केले नाही. तथापि, आमदार चंद्रकांत पाटील यांनी ‘लाईव्ह ट्रेंडस न्यूज’शी वार्तालाप करतांना विनोद तराळ हे सहकाऱ्यांसह आपल्या सोबत येणार असल्याचे स्पष्ट केले होते.
या अनुषंगाने आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज मुंबईमध्ये प्रवेश सोहळा पार पडला. यामध्ये विनोद तराळ यांच्यासह आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकासो पदाधिकारी असे शेकडो समर्थक यांनी हातात भगवा ध्वज घेत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या पक्षांतरामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांची मतदारसंघातील ताकद अजून वाढणार असून आ. एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
जिल्हा परिषद निवडणूक तोंडावर असतांना विनोद तराळ हे समर्थकांसह शिवसेनेत दाखल झाल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे. त्यांच्या शिवसेनेतील आगमनाचा अंतुर्ली तसेच परिसरावर मोठा परिणाम होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.