जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहराच्या दाणाबाजारात शुक्रवारी, १३ जून रोजी दुपारी चार वाजता पार्सल देण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांना शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या मारहाणीत एका तरुणाला लोखंडी पाईपनेही मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुप्रिम कॉलनी येथील रहिवासी मुस्तकीम शेख अलीम शेख (वय २०) हा तरुण भाटीया मार्केटमधील एका हार्डवेअरच्या दुकानात काम करतो. त्याचे दुकान मालक पवन दांडगे यांनी त्याला दाणाबाजारातील हिरा धनगर यांच्या ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये एक पार्सल देण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार, मुस्तकीम हा त्याचा सहकारी प्रफुल्ल कोळी (रा. मोहाडी) याला सोबत घेऊन ट्रान्सपोर्ट ऑफिसला गेला होता.
यावेळी, ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कुणाल कांबळे आणि त्याच्या एका साथीदाराने मुस्तकीम आणि प्रफुल्ल यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करत त्यांनी दोघांनाही बेदम मारहाण केली. मारहाणीदरम्यान, कुणाल कांबळे याने मुस्तकीमला लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केले.
मारहाणीत जखमी झालेल्या मुस्तकीमने रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तात्काळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीवरून कुणाल कांबळे आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.