चाळीसगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर २०२५ उपक्रमांतर्गत आज चाळीसगाव तालुक्यातील हातले महसूल मंडळात सामाजिक सभागृह, हातले येथे भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. आमदार मंगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शिबिरात ९७९ नागरिकांना विविध सेवा आणि योजनांचा थेट लाभ मिळाल्याने हा उपक्रम यशस्वी ठरला.
१२ विभागांचा सहभाग आणि योजनांचा महापूर
या समाधान शिबिरात महसूल विभागासह कृषी, आरोग्य, ग्रामपंचायत, अन्न व नागरी पुरवठा, महिला व बालकल्याण, सेतू सेवा, बांधकाम, सामाजिक न्याय आदी अनेक विभागांनी सक्रिय सहभाग घेतला. यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी अनेक शासकीय सेवा उपलब्ध झाल्या. शिबिरात राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत १ लाख रुपयांच्या अनुदानाचे ३ ट्रॅक्टर वाटप करण्यात आले. संजय गांधी निराधार योजनेत १०२ लाभार्थ्यांची डीबीटी प्रक्रिया पूर्ण झाली, तर आरोग्य तपासणीसाठी २५८ नागरिकांनी सहभाग घेतला. तालुका कृषी कार्यालयाच्या विविध सेवांचा ८९ नागरिकांना लाभ मिळाला.
अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे १२४ शिधापत्रिका वितरित करण्यात आल्या. सेतू केंद्राच्या माध्यमातून उत्पन्नाचे ७४, जातीचे ३७ आणि वय, अधिवास व रहिवासाचे ६४ दाखले देण्यात आले. ग्रामपंचायत विभागामार्फत २९ जॉब कार्ड वाटण्यात आली. जननी सुरक्षा योजनेत १७, लेक लाडकी योजनेत ६ आणि आयसीडीएस योजनेंतर्गत ७ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले. बांधकाम कामगारांना २ साहित्य किट्स व १ वजन काटा वाटण्यात आला, तर विद्यार्थ्यांना मोफत ८९ पुस्तकांचे संच देण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ३ ठिकाणी भूमीपूजन सोहळे पार पडले. महसूल विभागाने ‘शेत सुलभ योजना’ आणि ‘जिवंत सातबारा मोहिमे’ अंतर्गत २२ लाभार्थ्यांना सेवा दिली, तर तुकडा शेरा कमी करण्याच्या मोहिमेत ५२ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
हातले ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रशासकीय समन्वयाचे यश
हातले ग्रामस्थांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पावसातही मोठ्या संख्येने उपस्थित राहून नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेतला. सर्व विभागांचे प्रभावी समन्वय आणि एकाच छताखाली अनेक सेवा उपलब्ध झाल्यामुळे हे शिबिर अत्यंत यशस्वी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. अशा शिबिरांमुळे शासकीय योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचते आणि त्यांना तात्काळ लाभ मिळतो, ज्यामुळे प्रशासनावरचा नागरिकांचा विश्वास वाढतो. हे शिबिर म्हणजे प्रशासकीय कार्यक्षमतेचे आणि लोककल्याणकारी धोरणांचे एक उत्तम उदाहरण ठरले.