भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील रहिवाशी १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा हा चालवत असलेली दुचाकी दुभाजकावर आदळल्याने त्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना ९ जुलै रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. याबाबत बुधवारी ३० जुलै रोजी रात्री ९ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य शैलेद्र अहीरे वय १५ रा. वरणगाव ता. भुसावळ असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, वरणगाव शहरात आदित्य अहीरे हा मुलगा आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होता. ९ जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास आदित्य हा दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीके २७२५) ने वरणगाव शहराकडे जात होता. त्यावेळी वरणगाव येथील ऑर्डनन्स फॅक्टरीसमोरील दुभाजकावर त्याची दुचाकी आदळली. या अपघात आदित्य हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रेमचंद सपकाळे हे करीत आहे.