मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगरच्या राजकारणातील एक मातब्बर व्यक्तीमत्व म्हणून ख्यात असणारे विनोद तराळ हे शिवसेना शिंदे गटाच्या मार्गावर असून ते लवकरच पक्षांतर करणार असल्याचे वृत्त आहे. यामुळे आमदार एकनाथराव खडसे यांना जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे.
मूळचे मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील रहिवासी असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच ‘माफदा’ संस्थेचे प्रदेशाध्यक्ष विनोद तराळ हे सद्यस्थितीत शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. पक्ष संकटात आला असतांना देखील ते आजवर एकनिष्ठ राहिलेले आहेत. आता मात्र ते राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना शिंदे गटात सहभागी होणार असल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
या संदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात ते मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेणार आहेत. त्यांच्या सोबत अनेक आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकासो पदाधिकारी हे देखील शिवसेनेत दाखल होणार आहेत. या माध्यमातून शरद पवार गटाला अंतुर्ली गटात भले मोठे खिंडार पडणार असल्याची बाब निश्चीत मानली जात आहे.
विनोद तराळ यांच्या पक्षांतरामुळे आमदार एकनाथराव खडसे यांना मोठा धक्का बसणार असून याच्या उलट आमदार चंद्रकांत पाटील यांची स्थिती मजबूत होणार आहे. एकंदरीत पाहता पुढील आठवडा हा मुक्ताईनगरच्या राजकारणात मोठ्या घडामोडींमुळे गाजणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.