मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात १६ जून रोजी मोठ्या उत्साहात झाली. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, तसेच त्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने या वर्षापासून जिल्हा परिषद शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने इयत्ता पहिलीत दाखल पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेतच दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला पालकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेसाठी शासनाच्या प्रयत्नांना बळ मिळाले.
पहिल्याच दिवशी १००% पटनोंदणीचा विक्रम
यावर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी पालक आपल्या पाल्यांना घेऊन सकाळीच शाळेत उपस्थित झाले होते. ३१ पैकी सर्वच्या सर्व ३१ दाखल पात्र विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पहिलीत प्रवेश देऊन पटनोंदणीचे शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात आले. हा जिल्हा परिषद शाळेसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या या विद्यार्थ्यांचे फेटे बांधून बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच, सेल्फी पॉईंट तयार करून विद्यार्थी व पालकांचे सेल्फी फोटो घेण्यात आले आणि बुके देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना खाऊचेही वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके वाटप व मान्यवरांची उपस्थिती
शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेश आणि बुटांचे वाटप करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश भगत, सरपंच प्रतिभा कोल्हे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अर्जुन कोळी, विनोद जावरे, गजानन कांदेले यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याशिवाय, शिक्षण विस्तार अधिकारी सुनील कोंघे साहेब, केंद्रप्रमुख विजय दुट्टे, विषय साधन व्यक्ती महिंद्र मालवेकर यांनीही कार्यक्रमाला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक अनिल पवार सर, भिका जावरे सर, सोमनाथ गोंडगिरे सर, गोपाल दुतोंडे सर व स्वाती भंगले मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.