मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खुल्लर समितीने दिलेल्या अहवालामुळे लिपिक आणि लेखा संवर्गातील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय लिपिक संवर्ग वेतन त्रुटी व जुनी पेन्शन संघटनेचे राज्य अध्यक्ष अशोक डहाळे यांच्या अध्यक्षतेखाली मुक्ताईनगर व भुसावळ येथे झालेल्या बैठकीत या अहवालावर सविस्तर चर्चा करण्यात आली. चौथ्या वेतन आयोगापासून लिपिक व लेखा संवर्गातील कर्मचाऱ्यांवर वेतनावर झालेल्या अन्यायाबाबत लिपिक वर्गीय संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना आणि महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद युनियन यांनी सातत्याने मागणी केली होती. मात्र, खुल्लर समितीने या संघटनांच्या मागण्यांचा विचार न करता लिपिक वर्गीय व लेखा संवर्गातील कर्मचाऱ्यांविरुद्ध अहवाल दिल्याने वेतन त्रुटींमध्ये तफावत निर्माण होऊन कर्मचाऱ्यांचा अवमान झाल्याचा आरोप करण्यात आला.
शासनाच्या निर्णयामुळे जि.प. कर्मचाऱ्यांत असंतोष
दि. २ जून २०२५ रोजी शासनाकडून यासंदर्भात निर्णय निर्गमित झाल्यामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. या गंभीर स्थितीवर तोडगा काढण्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत सर्व राज्यस्तरीय संघटनांनी एकत्रित येऊन कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. याच कृती समितीच्या माध्यमातून दि. २२ जून २०२५ नंतर ‘लेखणी बंद’ आंदोलन पुकारण्याचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारी, दि. १३ जून २०२५ रोजी संघटनेच्या बैठकीनंतर पंचायत समिती मुक्ताईनगर व भुसावळच्या आवारात पंचायत समितीसमोर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी २ जून २०२५ च्या शासन निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला. याबाबत शासनास निवेदन देण्याचेही यावेळी ठरले.
विमान अपघातातील मृतांना श्रद्धांजली व उपस्थिती
बैठक संपल्यानंतर, अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानाचा अपघात झाल्याचे वृत्त मिळाल्याने, त्यात मरण पावलेल्या सर्व नागरिकांसाठी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. मृतांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी प्रार्थना करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
लिपिक वर्गीय संघटनेच्या बैठकीला नितीन लोलगे (जिल्हाध्यक्ष), नितीन पाटील (राज्य सदस्य), सुधाकर राठोड (राज्य सदस्य), किरण सावकारे (तालुका अध्यक्ष, मुक्ताईनगर), गोरखनाथ भामरे (तालुका अध्यक्ष, भुसावळ), गिरीश एदलाबादकर (सचिव, भुसावळ), कैलास रोझतकार (तालुका संघटक, मुक्ताईनगर), राहुल तायडे (तालुका संघटक, भुसावळ) यांच्यासह युवराज महाजन, के.एस. पवार, संजीव झोपे, हितेंद्र महाजन, प्रेमदास बोदडे, प्रफुल्ल देवरे, श्रीमती रिता वायकोळे, सरोज पाटील, शिखा काश्यप, अनिता बोदडे, ज्योती बागरे, हिरकणी नेहते, वैशाली आव्हाड, मनीषा सपकाळ, कविता नारखेडे, जे.बी. तायडे, आर.डी. सोनवणे तसेच इतर सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवला.