अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर येथील राज्य परिवहन महामंडळाच्या (ST) आगाराला ७ जून रोजी सकाळी १० वाजता ५ नवीन बस मिळाल्या. आ. अनिल पाटील यांच्याहस्ते, मान्यवर आणि प्रवाशांच्या उपस्थितीत वाजत-गाजत या बसेसचे लोकार्पण करण्यात आले. यामुळे अमळनेरमधील प्रवाशांना आता अधिक चांगल्या आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.
आमदारांच्या हस्ते थाटात लोकार्पण
यावेळी माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, विनोद पाटील, आगार व्यवस्थापक प्रमोद चौधरी आणि आगार प्रमुख अनिकेत न्हायदे उपस्थित होते. सजवलेल्या पाचही नवीन बसेसचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. आमदार पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, विद्यार्थी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी अमळनेर आगाराला एकूण २५ नवीन बसेसची मागणी केली होती, त्यापैकी १० बसेस मंजूर झाल्या आहेत. आज प्रत्यक्ष ५ बसेस प्राप्त झाल्या असून, उर्वरित ५ बसेस लवकरच उपलब्ध होतील.
आगाराचे नूतनीकरण, मॉडेल स्थानकाचे ध्येय
आमदार पाटील यांनी पुढे सांगितले की, अमळनेर आगारासाठी मंजूर झालेल्या ९ कोटी निधीतून अर्ध्या बस स्थानकाचे नूतनीकरण काम वेगाने सुरू झाले आहे. लवकरच उर्वरित स्थानकाच्या कामासाठीही निधी मिळवून अमळनेर बस स्थानक हे मॉडेल स्थानक बनवण्याचा प्रयत्न आहे. यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांचे अनमोल सहकार्य लाभत असल्याने, जनतेच्या वतीने त्यांनी सर्वांचे आभार मानले.
आमदारांनी स्वतः बसमधून काढली रॅली
विशेष म्हणजे, आमदार अनिल पाटील यांनी स्वतः बसमध्ये बसून डीजेच्या तालावर या पाचही नवीन बसेस धुळे रस्त्यावरून वाजत-गाजत बस स्थानकात आणल्या. या बस रॅलीकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले होते. आपल्या हक्काची लालपरी आता नव्या रूपात येत असून, सुरक्षित प्रवासासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी बसने प्रवास करावा, असा संदेश आमदारांनी दिला. तसेच, स्थानकात त्यांनी स्वतः स्टेरिंग हातात घेऊन चालक व वाहकांचा उत्साह वाढवला.
प्रवाशांची गैरसोय दूर होणार
या नवीन बसेस उपलब्ध झाल्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास सुखकर होणार आहे. तसेच, बसेसअभावी बंद झालेल्या काही फेऱ्या पुन्हा सुरू होऊन विद्यार्थी आणि नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. यासाठी आमदार अनिल पाटील यांनी केलेल्या यशस्वी पाठपुराव्याबद्दल प्रवाशांनी त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी एस.टी. कामगार संघटनेचे पदाधिकारी एल.टी. पाटील, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे, अर्बन बँक संचालक प्रवीण जैन, भास्कर बोरसे, महेंद्र पाटील, प्रा. सुनील पाटील यांच्यासह एसटी महामंडळाचे अनेक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.