अमळनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे ठेकेदाराच्या भावाचा अमानुषपणे मारहाण करून खून करणाऱ्या पाचही संशयित आरोपींना अमळनेर पोलिसांनी शिताफीने मध्यप्रदेशातील दुर्गम भागातून अटक केली आहे. या यशस्वी कारवाईमुळे अमळनेर पोलिसांचे कौतुक होत आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे विजेच्या तारा ओढण्यासाठी मध्यप्रदेशातून मजूर आणणाऱ्या कैलास शामसिंग प्रजापती यांना २९ मे रोजी मजुरांनी अमानुष मारहाण केली होती. कामाचे पैसे देत नसल्याने आणि दुसरे कामगार कामावर आणल्याच्या रागातून मजुरांनी लोखंडी पाईप व पहारीने कैलास यांच्या हात, पाय आणि तोंडावर गंभीर वार केले. कैलास रात्रभर विकास सोसायटी कार्यालयात बेशुद्ध अवस्थेत पडून होते. सकाळी त्यांना उपचारासाठी अमळनेरहून धुळे आणि नंतर इंदूरला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मारहाण करणारे आरोपी घटनेनंतर लगेच फरार झाले होते.
या घटनेची गंभीर दखल घेत, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवले आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, हेडकॉन्स्टेबल विजय भोई, पोलीस राहुल गोकुळ पाटील आणि राहुल नारायण पाटील यांचे पथक रवाना केले. आरोपी मध्यप्रदेशातील दुर्गम डोंगराळ भागांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पळून गेले होते.
पोलिस पथकाने मोबाईल सेलचे गौरव पाटील आणि मिलिंद जाधव यांच्या तांत्रिक मदतीने आणि मध्यप्रदेश पोलिसांच्या सहकार्याने सुमारे १०० ते १५० किलोमीटर परिसरातून विविध डोंगर-दऱ्या पिंजून काढल्या. अथक प्रयत्नांनंतर गोपाल साहुलाल धुर्वे (वय ३५), पंकज उमरावसिंग शिलु (वय २७), सलीम निर्मलशहा धुर्वे (वय २२), रोहित बुद्धसिंग शिलु (वय १९) आणि शिवम फुलसिंग शिलु (वय १८) (सर्व रा. बीजाधाना, पो. ईटावा, ता. तामिया, जि. छिंदवाडा, मध्यप्रदेश) या पाचही आरोपींना अटक केले. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.