धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव येथे एका तरुणाला आपल्या मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून तीन जणांनी लाकडी काठी, फायटर आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना १३ जून रोजी सायंकाळी घडली होती, याबाबत मंगळवारी १७ जून रोजी दुपारी १ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव येथे पांडुरंग रवींद्र सोनवणे (वय २७, रा. लहान माळीवाडा, धरणगाव) हा आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला असून, शेतीचे काम करून उदरनिर्वाह करतो. संशयित आरोपी विकी पवार याने पांडुरंग सोनवणे यांच्या मैत्रिणीला फोन केला होता. याचा जाब विचारण्यासाठी पांडुरंगने विकीला बोलावून घेतले होते. १३ जून रोजी सायंकाळी साडेसात वाजता विकी पवार त्याच्यासोबत नरेंद्र फुलपगार आणि अक्षय महाजन (तिघे रा. धरणगाव) हे धरणगाव रेल्वे स्थानकाजवळ आले. त्यांनी पांडुरंग सोनवणे याला लाकडी काठी, फायटर आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, ज्यात पांडुरंग गंभीर जखमी झाला.
या मारहाणीच्या घटनेसंदर्भात मंगळवारी १७ जून रोजी दुपारी १ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार मारहाण करणारे विकी पवार, नरेंद्र फुलपगार, अक्षय महाजन या तिघांवर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करत आहेत.