पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५१व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पारोळा येथे छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पारोळा तालुका सदस्यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून शिवकार्याच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत प्रतिष्ठानने यंदा सलग दुसऱ्या वर्षी हे रक्तदान शिबिर भरवले असून, यंदाच्या शिबिरात एकूण ४२ रक्तदात्यांनी स्वराज्याच्या सन्मानार्थ रक्तदान केले.
४२ रक्तदात्यांनी स्वराज्याचा सन्मान राखत दिले रक्तदान, तेजस बारी आणि नवल पाटील यांचा विशेष सहभाग
शिबिराचा प्रारंभ शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पूजन करून अभिवादनाने झाला. त्यानंतर उत्साही वातावरणात रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. प्रत्येक रक्तदात्यास शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिमा, प्रमाणपत्र, ५० हजार रुपयांचा अपघाती विमा, आयुष्यभर मोफत रक्तपुरवठा यांसह श्री गणेशा एक्सरे सेंटरतर्फे एक्सरे सेवांवर ३०% सवलत देण्यात आली.
या उपक्रमासाठी छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठानचे सर्व सदस्य सक्रिय होते. तसेच पारोळा तालुका मेडीकल असोसिएशन व धुळे येथील जीवनज्योती ब्लड बँक टीमचेही मोलाचे सहकार्य लाभले. या शिबिरास मा. नगराध्यक्ष चंद्रकांत बी. पाटील, सौ. किरणताई चंद्रकांत पाटील, तसेच डॉक्टर सेलचे जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. महेश पवार यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
या शिबिरात विशेष लक्षवेधी ठरलेले दोन रक्तदाते म्हणजे तेजस बारी व नवल पाटील. तेजस बारी याने एका हाताने अपंगत्व असूनही रक्तदान केले, तर ५६ वर्षीय नवल पाटील यांनी सलग दुसऱ्या वर्षीही रक्तदान करून शिवप्रेम आणि सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले.
एकूणच, शिवप्रेम आणि समाजसेवेच्या संगमातून उभे राहिलेले हे रक्तदान शिबिर हे केवळ सामाजिक उपक्रम नव्हते, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आजच्या पिढीत रुजवणारा प्रेरणादायी सोहळा होता.