चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बनावट सहीचे जॉइनिंग लेटर देऊन मंत्रालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणीची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार चाळीसगाव शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणात चाळीसगाव तालुक्यातील तिघांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.
सायगाव येथील एका भागात राहणारी तरूणीला मुबई येथील मंत्रालयात क्लर्कच्या नोकरीचे आमिष दाखवून बनावट जॉइनिंग लेटर देण्यात आले. हे लेटर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लेटरपॅडवर व त्यांच्या सहीसह देण्यात आल्याने प्रथमदर्शनी ते खरे वाटले. परंतु मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकृत नियमांनुसार जॉइनिंग लेटरवर मुख्यमंत्री नव्हे तर संबंधित विभागप्रमुख अथवा सचिवांची सही असते, हे नातेवाईकांनी लक्षात आणून दिल्यानंतर गीता हिने संशय व्यक्त केला.
गीता हिने याबाबत मुख्य आरोपी सर्वेश प्रमोद भोसले याच्याकडे चौकशी केली असता, त्याने खळबळजनक माहिती दिली. जॉइनिंग लेटर मिळण्याबाबतचा तगादा वाढल्याने त्याने खडकी येथील स्वामी ग्राफिक्सवर रणजीत मांडोळे यांच्या मदतीने इंटरनेटवरून “cm officer letter maharashtra” असे सर्च केले आणि मिळालेल्या लेटरपॅडवर बनावट मजकूर टाईप करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नकली सही टाकून जॉइनिंग लेटर तयार केल्याचे त्याने कबूल केले.
या संपूर्ण प्रकारात तिसरा आरोपी तुषार उर्फ रोहीत मधुकर बेलदार याने देखील सहभाग घेतल्याचे निष्पन्न झाले असून, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी करीत आहेत. या फसवणुकीच्या प्रकारामुळे चाळीसगाव तालुक्यात खळबळ उडाली असून, अशाप्रकारे बनावट सरकारी कागदपत्रे तयार करून आणखी किती लोकांची फसवणूक झाली आहे याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. सद्यस्थितीत शहरात अशा स्वरूपाच्या प्रकरणांबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू असून, मोठ्या फसवणूक रॅकेटचा संशय व्यक्त केला जात आहे.