अमळनेर-गजानन पाटील । मुंबईतील मुंब्रा रेल्वे स्थानकावर ९ जून रोजी सकाळी घडलेल्या रेल्वे अपघातात, शेकडो लोक केवळ आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत असताना, अमळनेरच्या सुपुत्राने आणि त्याच्या दोन मित्रांनी धाडस दाखवत तीन ते चार प्रवाशांचे प्राण वाचवले. होमगार्ड सचिन दिगंबर पाटील आणि त्याचे मित्र शुभम बुट्टे व सचिन ढोके यांनी दाखवलेल्या या समयसूचकतेचे आणि सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, सचिन पाटील, शुभम बुट्टे आणि सचिन ढोके हे तिघे मित्र आपली होमगार्डची ड्युटी संपवून परत येत असताना मुंब्रा रेल्वे स्थानकावर पोहोचले. त्याचवेळी काही वेळापूर्वी झालेल्या रेल्वे अपघातामुळे अनेक जखमी आणि मृत प्रवासी रेल्वे रुळावर पडले होते. हजारो प्रवाशी हा भीषण प्रसंग आपल्या मोबाईलमध्ये चित्रित करण्यात मग्न असताना, या तिन्ही तरुणांनी क्षणाचाही विचार न करता तात्काळ धाव घेतली.
जखमींना वाचवण्यासाठी सचिन पाटील व मित्रांची जिवाची बाजी
त्यांनी कोणताही जीव धोक्यात न घालता, रेल्वे रुळावर पडलेल्या जखमींना आणि मृतांना उचलून रेल्वे प्लॅटफॉर्मवर आणले. जखमी प्रवाशांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यासाठी त्यांनी मदत केली. यामुळे, जे जखमी अवस्थेत रुळावर पडले होते, त्यांना वेळेवर उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले. मोबाईलवर चित्रीकरण करण्यापेक्षा त्यांनी माणुसकीचा धर्म जपला, हे यावेळी प्रकर्षाने दिसून आले. एकामागोमाग लोकल येत असल्याने जीव धोक्यात घालून रुळावर उतरणे हे अत्यंत धोकादायक होते, तरीही या तरुणांनी ते धाडस दाखवले.
अमळनेरच्या तरुणाईचे सर्वत्र कौतुक
अमळनेर तालुक्यातील देवगाव-देवळी येथील रहिवासी असलेल्या दिगंबर लोटन पाटील यांचा मुलगा सचिन पाटील हा अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच महाराष्ट्र होमगार्डमध्ये रुजू झाला आहे. त्याचे वडील डोंबिवली येथे रिक्षा चालवून त्याला पदवीपर्यंतचे शिक्षण देत आहेत. पोलीस आणि सैन्य दलात भरती होण्यासाठी तो प्रयत्नशील आहे. या घटनेने सचिन पाटील आणि त्याच्या मित्रांनी मुंबई महानगरीत आपला ‘खान्देशी बाणा’ दाखवत सामाजिक एकोपा आणि बांधिलकीचा संदेश दिला आहे. त्यांच्या या धाडसाचे संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक होत आहे.