चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील हातगाव गावात सोमवारी, २ जून रोजी सकाळी ११ वाजता एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. विजय सुखदेव चव्हाणके (पती) याने आपल्याच शेतात पत्नी वर्षा विजय चव्हाणके (वय-४०) हिचा दोरीने गळा आवळून निर्घृण खून केला. या क्रूर कृत्यानंतर विजय चव्हाणके याने शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास लावून आपले जीवन संपवले. या दुहेरी मृत्यूमुळे संपूर्ण हातगाव आणि चाळीसगाव तालुका हादरून गेला असून, परिसरात शोककळा पसरली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, चारित्र्याच्या संशयावरून हा भयानक प्रकार घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. विजय आणि वर्षा यांच्यातील कौटुंबिक वाद विकोपाला जाऊन या घटनेत रूपांतरित झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच, चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहूलकुमार पवार यांनी आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि ते चाळीसगाव उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले.
या दुर्दैवी घटनेमुळे हातगाव गावावर स्मशान शांतता पसरली असून, विजय आणि वर्षा चव्हाणके यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कौटुंबिक कलह आणि संशयाने इतके टोकाचे पाऊल उचलले जाऊ शकते, यावर ग्रामस्थांना विश्वास ठेवणे कठीण झाले आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
.