पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीतील २०१९-२० च्या कापूस हंगामात शासनाने खरेदी केलेल्या कापसावरील तोलाईची रक्कम मिळण्यासाठी बाजार समितीचे मापाडी वारंवार मागणी करत होते. याआधीच्या प्रशासनाने त्यांना ‘ना हरकत’ दाखला दिला नसल्यामुळे ही रक्कम कापूस फेडरेशनने सीसीआयकडे वर्ग केली होती. मात्र, आता हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे, ज्यामुळे गोरगरीब मापाड्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
डॉ. सतीश पाटील यांच्या प्रयत्नांना यश
१६ मे २०२३ रोजी डॉ. सतीश भास्करराव पाटील (माजी पालकमंत्री, जळगाव) यांनी सभापती पदाची धुरा सांभाळल्यानंतर या प्रश्नाकडे लक्ष दिले. त्यांनी १६ जून २०२३ रोजी तोलाई मिळण्याबाबतचा प्रस्ताव कॉटन फेडरेशन, मुख्य कार्यालय, मुंबई यांच्याकडे पाठवला. सातत्याने पाठपुरावा करून आणि विशेष प्रयत्न केल्यामुळे अखेर १७ जून २०२५ रोजी १८ लाख १५ हजार ७५७ रुपये स्टेट बँक शाखा पारोळा येथे जमा झाले. यामुळे मापाड्यांची थकीत रक्कम मिळाल्याचे समाधान वाटत असल्याचे माजी पालकमंत्री सतीश पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
मापाड्यांना मिळाला दिलासा
यामध्ये गुलाब सखाराम मराठे, उखा बारकू मराठे, केशव नामदेव शेठे, रामकृष्ण पुंडलिक पाटील, सुनीता कार्तिक पाटील या मापाड्यांचा समावेश आहे, ज्यांना त्यांची प्रलंबित रक्कम मिळाली आहे. यावेळी पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुधाकर पाटील, सचिव दीपक पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी आणि व्यापारी बांधव उपस्थित होते. सतीश पाटील यांच्या प्रयत्नांमुळे मापाड्यांना आर्थिक स्थैर्य मिळाले असून, त्यांनी समाधान व्यक्त केले.