पारोळा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील मंदाणे येथील ग्रामपंचायतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून एक महत्त्वपूर्ण आणि स्तुत्य निर्णय घेतला आहे. ज्या पालकांनी आपल्या पाल्यांना इयत्ता पहिलीमध्ये जिल्हा परिषद शाळा, मंदाणे येथे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे, अशा सर्व पालकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या टिकवून संस्कारक्षम विद्यार्थी घडावेत, या उद्देशाने घरपट्टी व नळपट्टी या आर्थिक वर्षात पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ग्रामपंचायतीचा सर्वानुमते निर्णय
हा निर्णय ग्रामपंचायत मंदाणेचे सरपंच सुलाबाई रोहिदास पाटील, उपसरपंच राजकुमार दगडू पाटील, सदस्या पूजा एकनाथ पाटील, शरद भालेराव पाटील, नितिक्षा रवींद्र पाटील, माधुरी राकेश पाटील, रामकृष्ण राजाराम पाटील, जिजाबाई भील, ज्ञानेश्वर बहिरम यांनी सर्वानुमते घेतला आहे. या निर्णयाचे माजी सरपंच बापुसो डी. के. पाटील, दादासो. एकनाथ पाटील, विकासो चेअरमन रवींद्र सुभाष पाटील, व्हा. चेअरमन आधार नाथबुवा, सर्व संचालक, पोलीस पाटील अशोक पाटील, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक किरण पाटील, सर्व शिक्षक तसेच सर्व माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व व पालकांचा सत्कार
जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे आणि संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्याचे काम करतात. जिल्हा परिषद शाळा टिकाव्यात व त्यांची पटसंख्या वाढावी यासाठी प्रोत्साहन म्हणून पालकांची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याचा हा निर्णय ग्रामपंचायत मार्फत घेण्यात आला आहे. यावेळी ज्या पालकांनी स्वयंस्फूर्तीने आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेत दाखल केले, अशा सर्व पालकांचा ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सुलाबाई पाटील, उपसरपंच राजकुमार पाटील, पोलीस पाटील अशोक पाटील, मुख्याध्यापक किरण पाटील, शरद पाटील, राहुल पाटील, ग्रामसेवक भानुदास पाटील, भरत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.