मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । गेल्या तीन ते चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा होताना दिसत आहे. राज्य सरकारने राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. नगरविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अ, ब आणि क वर्ग महानगरपालिकांनाही आपापल्या प्रभागांची रचना करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत. ही प्रभाग रचना प्रक्रिया पूर्ण होताच, निवडणुकांचे वेळापत्रकही लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सध्या प्रशासक असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लवकरच लोकप्रतिनिधी येण्याची चिन्हे आहेत.
२१ प्रमुख महापालिकांमध्ये बदल
या आदेशामुळे राज्यातील अनेक मोठ्या शहरांमधील प्रभाग रचना बदलणार आहे. यामध्ये पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर, कल्याण-डोंबिवली, अमरावती, अहमदनगर, अकोला, कोल्हापूर, सोलापूर, सांगली-मिरज-कुपवाड, मिरा-भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी, जळगाव, नांदेड-वाघाळा या प्रमुख महापालिकांचा समावेश आहे.
‘ड’ वर्ग महापालिकांसाठी विशेष नियम
‘ड’ वर्गातील महापालिकांसाठी प्रभाग रचना करताना शक्यतो सर्व प्रभाग चार सदस्यांचे असतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, काही ठिकाणी सर्वच प्रभाग चार सदस्यांचे करणे शक्य नसल्यास, एक प्रभाग तीन किंवा पाच सदस्यांचा असू शकतो, किंवा दोन प्रभाग तीन सदस्यांचे असू शकतील. यामध्ये अमरावती, अहमदनगर, अकोला, कोल्हापूर, सोलापूर, सांगली-मिरज-कुपवाड, मिरा-भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, जळगाव, नांदेड, धुळे, मालेगाव, लातूर, चंद्रपूर, परभणी, पनवेल, इचलकरंजी आणि जालना या महापालिकांचा समावेश आहे.
मुंबईची प्रभाग रचना अबाधित
विशेष बाब म्हणजे, मुंबईतील प्रभाग रचनेत कोणताही बदल होणार नाही. मुंबई महानगरपालिकेमध्ये जुन्याच प्रभागानुसार, म्हणजेच २२७ एकसदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेतल्या जाणार आहेत. तर, इतर सर्व महापालिकांमध्ये चार सदस्यांचे प्रभाग असणार आहेत. या निर्णयामुळे रखडलेल्या निवडणुका लवकरच पार पडतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.